Maharashtra Rain Alert महाराष्ट्राच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळांची धोका वाढला
केवळ पाऊसच नव्हे तर यासोबतच वादळांचाही धोका वाढला आहे. हवामान खात्याने वादळांबाबत इशारा देताना सांगितले की, या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईतही आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
अहमदनगर, सातारा, पुणे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील २४ तासांसाठी अहमदनगर, सातारा, पुणे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. हा इशारा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
अवकाळी पावसाचे संकट सुरुच
हवामान खात्याच्या माहितीनुसार आणखी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम राहणार आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेवर म्हणजेच ७ जूनला होणार आहे. त्यामुळे केवळ आणखी काही दिवसांचा कालावधी आहे. मात्र दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
येणाऱ्या काळातील बातम्यांकडे लक्ष द्यावे लागणार
अवकाळी पावसाची ही स्थिती लक्षात घेता आगामी काळात बातम्यांकडे सतर्क राहण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच सरकार आणि प्रशासनानेही यासंदर्भात तयारी ठेवणे आवश्यक आहे. अशा स्थितीत दक्ष राहिल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळता येईल.