High Tide Alert मुंबई, केरळ आणि तामिळनाडूत समुद्रात उंच लाटांची भीती
समुद्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) या संस्थेने अलीकडेच मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूच्या किनारपट्टीसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. या भागात 4 मे रात्री 2.30 वाजेपासून ते 5 मे रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीला हवामान शास्त्रज्ञ ‘कलक्कडल’ म्हणतात.
मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा
INCOIS ने मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमधील मच्छिमारांना त्यांच्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा इशारा दिला आहे. समुद्रातील उंच लाटांमुळे मच्छिमारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या 36 तासांच्या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश करू नये, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेनेही केली आहे.
मुंबईत ऊकाड्याची झळ
मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर शनिवार आणि रविवारी उष्णतेसह दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही शनिवार आणि रविवारी कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, मुंबईत दोन दिवस ऊकाड्याची झळ बसण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासह विविध भागांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने शनिवार आणि रविवारसाठी सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या भागांसह किनारपट्टीसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटा किंवा उष्णतेच्या लाटसद्दश्य परिस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.
हायटाईडचा धोका
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाच्या मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबईत 22 वेळा हायटाईडची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची भीती निर्माण होते. पावसासोबत हायटाईड आल्यास ही भीती अधिक वाढते.
निसर्गाच्या या अनिश्चित घटना लक्षात घेता, मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनानेही यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. High Tide Alert